Pakistan condition to play India; fact behind news : T20 विश्वचषक 2026 सुरू होण्यापूर्वीच भारत-पाकिस्तान क्रिकेट युद्धाने मैदानाबाहेर रौद्र रूप धारण केले आहे. आधी "भारतासोबत खेळणार नाही" असा पवित्रा घेणाऱ्या पाकिस्तानने आता आपल्या भूमिकेतून 'यू-टर्न' घेतल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, पाकिस्तानी मीडियाने पेरलेल्या या दाव्यांमागे खरोखर काही तथ्य आहे की, हे केवळ दबावाखालील बोलणे किंवा एखादे नवे नाटक आहे, हे येत्या काळात समजेल, असे लोक म्हणत आहेत.
पाकिस्तानचा नवा पवित्रा.. या अटी..
पाकिस्तानी मीडियामध्ये सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळण्यास तयार आहे, पण त्यांनी आयसीसीसमोर (ICC) एक अट ठेवली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर आयसीसीने बांगलादेशला पुन्हा स्पर्धेत सामावून घेतले आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या, तरच पाकिस्तान भारतासोबत मैदानात उतरेल. मात्र, क्रिकेट विश्लेषकांच्या मते, ही केवळ एक अफवा असू शकते. आयसीसीने आधीच बांगलादेशची हकालपट्टी करून स्कॉटलंडचा समावेश केला आहे, त्यामुळे आता पुन्हा निर्णय बदलणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे.
2290 कोटींचा फटका आणि 'वॉकओव्हर'ची भीती
भारत-पाकिस्तान हा सामना म्हणजे आयसीसीसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. या एका सामन्यातून सुमारे 2290 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जर पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर ब्रॉडकास्टर्सना (जिओस्टार) प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. अशा परिस्थितीत आयसीसी पाकिस्तानवर मोठा आर्थिक दंड आकारू शकते. पण पाकिस्तानी मीडियाचा असा दावा आहे की, आयसीसी पाकिस्तानने भारतासोबतचा सामना खेळावा, यासाठी त्यांच्या विनवण्या करत आहे. यानंतर पाकिस्तानने आयसीसीसमोर अट ठेवली आहे, अशा बातम्या पाकिस्तानी मीडियाकडून चालवल्या जात आहेत.
जर पाकिस्तान 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबोमध्ये खेळायला आला नाही, तर भारताला विनासायास 2 गुण मिळतील. याची जाणीव पाकिस्तानलाही आहेच. हे नुकसान टाळण्यासाठीच पाकिस्तान आता मध्यस्थीचे मार्ग शोधत असल्याचे बोलले जात आहे.
बांगलादेश प्रकरण आणि पाकिस्तानचे 'नाक'
या वादाची ठिणगी बांगलादेशपासून पडली. बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्यावर आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या वादात पाकिस्तानने उगाच 'नाक' खुपसून बांगलादेशला पाठिंबा दिला. मात्र, जेव्हा आयसीसीने बांगलादेशचे ऐकले नाही, तेव्हा चिडलेल्या पाकिस्ताननेही भारतावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. आता मात्र, आर्थिक परिस्थिती आणि आयसीसीच्या कारवाईच्या धास्तीने पाकिस्तानची दाबे दणाणले आहेत. आर. अश्विनसारख्या दिग्गज खेळाडूनेही दावा केला आहे की, "येत्या 4-5 दिवसांत पाकिस्तान नक्कीच माघार घेईल आणि सामना होईल."
अफवांचे पेव आणि पीसीबीचे मौन
गंमत म्हणजे, पाकिस्तान सरकारने 'नाही' म्हटले असले तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अजूनही आयसीसीला अधिकृतपणे काहीही कळवलेले नाही. पाकिस्तानी मीडिया ज्या अटींचा दावा करत आहे, त्याला आयसीसीने कोणताही दुजोरा दिलेला नाही. थोडक्यात, स्वतःची नाचक्की टाळण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा अटींचा घाट घातला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पाकिस्तानी मीडियाकडून पसरवल्या जात असलेल्या या सर्व बातम्या खोट्याच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. भारताचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्यांची टीम मात्र आपल्या वेळापत्रकानुसार कोलंबोला पोहोचून टॉससाठी सज्ज राहतील.
हेही वाचा – ICC T20 Rankings: टी20 रँकिंगमध्ये अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर; तर सूर्यकुमार आणि इशान किशनचीही मोठी झेप
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.