पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि तिच्या मृत्यूच्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात विशेष न्यायालयाने आरोप निश्चित केले असून आता या खटल्याची दररोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने सुनावणी होणार आहे. अवघ्या 28 दिवसांत पोलिसांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र सादर केल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीला प्रथमच प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकारी पक्षाने पीएम रिपोर्ट, वैद्यकीय चाचण्या, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. आरोपीच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला, मात्र बचाव पक्षाला कोणतेही ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने आरोपीविरोधात प्राथमिक स्वरूपाचे पुरावे असल्याचे नमूद करत आरोप निश्चित केले.
या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने करण्यात आला. घटनेनंतर अवघ्या 15 दिवसांत पोलिसांनी चार्जशीट दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियाही जलदगतीने पूर्ण करण्यात आली. आता खटल्याची पुढील सुनावणी रोज होणार असून ती ‘इन कॅमेरा’ पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुनावणीदरम्यानची माहिती सार्वजनिकपणे उघड केली जाणार नाही.
नेमकं काय घडलं होतं?
1 मे रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात ही संतापजनक घटना घडली होती. घरासमोर खेळत असलेल्या एका चिमुकलीला आरोपीने गोठ्यात नेले. वासरू दाखवण्याचा बहाणा करत त्याने त्या मुलीला फूस लावली आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिचा जीव घेतल्याचे तपासात समोर आले.
घटनेनंतर मुलगी बराच वेळ दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर गोठ्याजवळ संशयास्पद परिस्थितीत तिचा मृतदेह आढळून आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी मुलीला गोठ्याकडे घेऊन जाताना दिसला आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला.
या घटनेनंतर गावात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासादरम्यान आरोपीने आपण काही चुकीचे केले नसल्याचा दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयातही त्याने प्रकरणाचे गांभीर्य न समजल्यासारखे उत्तर दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते, मात्र पुराव्याअभावी तो निर्दोष सुटल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात तरी कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता पुढील सुनावण्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.