Nashik Kumbh Mela : साधू महंतांच्या गळ्यात आता ओळखपत्र, ढोंगी साधूंची गोची; कुंभमेळ्यात घुसता येणार नाही

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखाड़ा परिषदेने साधू-महंतांसाठी अधिकृत ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला.
Nashik Kumbh Mela : साधू महंतांच्या गळ्यात आता ओळखपत्र, ढोंगी साधूंची गोची; कुंभमेळ्यात घुसता येणार नाही

प्रतिनिधी किरण गोटूर,नाशिक:  नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अखेर, अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने साधू-महंतांना अधिकृत ओळखपत्र देण्याची योजना जाहीर केली आहे. या निर्णयामुळे बनावट आणि ढोंगी साधूंवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल आणि भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी मोठा उपाय ठरेल.

सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक महोत्सव नाही, तर लाखो भाविकांची श्रद्धा व भक्ती यांचं प्रतीकही आहे. या मोकळ्या वातावरणात काही अप्रामाणिक व्यक्ती साधू-महंतांच्या वेशात भाविकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच सामना करण्यासाठी अखाड़ा परिषदेने या ओळखपत्र योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अखाड़ा परिषदेच्या निर्णयानुसार, सिंहस्थ काळात होणाऱ्या मुख्य पूजा विधी, धार्मिक कार्यक्रम आणि शाही स्नानासाठी केवळ अधिकृत ओळखपत्र असलेल्या साधू-महंतांनाच सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी सर्व प्रमुख अखाड़े आपापल्या अखत्यारीतील साधू-महंतांची नोंदणी करून ओळखपत्रांची सोय करतील. प्रत्येक ओळखपत्रावर साधू-महंताचं नाव,अखाड़ा, धार्मिक परंपरा व मान्यता याची माहिती स्पष्ट असेल, जेणेकरून कोणता साधू कोणत्या अखाड़्याचा आहे, हे सहज ओळखता येईल.

अखाड़ा परिषदेच्या शंकरानंद सरस्वती यांनी या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, "ओळखपत्रामुळे साधू-महंतांची खरी ओळख स्पष्ट होईल आणि बनावट साधूंना सिंहस्थमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेचा अपमान होणार नाही."

राज्याचे कुंभ मंत्री गिरीश महाजन यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, "हा निर्णय सिंहस्थच्या आयोजनासाठी अत्यंत योग्य आहे. प्रशासनासाठी नियोजन व सुरक्षा दृष्टीने याचा मोठा फायदा होईल. भाविकांना सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात धार्मिक विधी अनुभवता येईल."

सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. लाखो भाविक दरवर्षी या सोहळ्यासाठी येतात. त्यामुळे या ओळखपत्र योजनेमुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे आणि धार्मिक परंपरांचे शुद्ध स्वरूप जपणे शक्य होईल.

अखाड़ा परिषदेने स्पष्ट केले आहे की, भाविकांच्या सुरक्षिततेसह धार्मिक परंपरा जपणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आगामी काळात ओळखपत्रांची वितरण प्रक्रिया कशी राबवली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रशासन आणि अखाड़ा परिषदेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सिंहस्थ कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडण्याची अपेक्षा आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा असून, बनावट साधू-महंतांवर आळा घालणे आणि भक्तांना दिशाभूल टाळणे या उद्देशाने त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version