Nashik Crime: नाशिकमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश! बंगल्यात सुरू होता कारखाना, पाच जण अटकेत

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तळेगाव येथे बनावट नोटांच्या कथित रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
Nashik Crime: नाशिकमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश! बंगल्यात सुरू होता कारखाना, पाच जण अटकेत

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील तळेगाव परिसरात बनावट चलनी नोटांच्या व्यवहाराचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीण आणि शहर पोलिसांना यश आले आहे. एका बंगल्यात सुरू असलेल्या या कथित रॅकेटवर संयुक्त कारवाई करत पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. घटनास्थळावरून बनावट नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांचे आमिष

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीकडून नागरिकांना मोठ्या रकमेच्या बदल्यात त्यापेक्षा जास्त मूल्याच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवले जात होते. 10 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा प्रस्ताव संशयितांकडून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. अशाच एका कथित व्यवहाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. व्यवहाराच्या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर तळेगाव येथील एका बंगल्याची झडती घेण्यात आली.

बंगल्यातच सुरू होता कारखाना

या कारवाईदरम्यान पोलिसांना बनावट चलनी नोटा आणि त्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे विविध साहित्य आढळून आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करून त्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करण्याचा प्रयत्न करत होते. बनावट नोटा तयार करण्याच्या पद्धतीबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती सार्वजनिक केलेली नाही.

या प्रकरणी अमरेश्वर आईथा आणि दासरी सत्यइ हे तेलंगणातील, तर गोकुळ दाते आणि हिरामण दाते हे तळेगाव, नाशिक येथील तसेच मच्छिंद्र घनदाट हा सातपूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version