सर्वसामान्यांच्या निरोगी आरोग्याकरिता राज्यभरात FDA च्या छापा पडण्याच्या बातम्या दुमदुमत होत्या. त्यापाठोपाठ नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूर शहरात डीजे, डॉल्बी सिस्टम आणि कर्णकर्कश आवाजाबद्दलचे नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली आहे. पोलिसांची नागपूर शहरातील बार, पब, कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून डीजे वाजविणाऱ्यांवर बारीक नजर आहे. याच मोहिमेअंतर्गत सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू कॉलनी परिसरात पार्क एव्हेन्यू इमारतीच्या 13 व्या मजल्यावरील ‘हिचकी बार अँड रेस्टॉरंट’वर एस्कॉर्ट पथकाने मध्यरात्री छापा टाकला.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर एस्कॉर्ट पथकाचे एपीआय भगवान कोळी हे पथकासह पार्क एव्हेन्यू इमारतीत दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत ध्वनी प्रदूषणाची तपासणी सुरू करण्यात आली. सुरुवातीला इमारतीच्या बाहेर साऊंड लेव्हल मीटरद्वारे मोजणी केली असता 63.2 डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला. त्यानंतर पोलिसांनी थेट 13 व्या मजल्यावर जाऊन तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली – तिथे ध्वनीची तीव्रता तब्बल 100.6 डेसिबल इतकी असल्याचे आढळून आले, जी मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त आहे.
तपासात 13 व्या मजल्यावरील बारमधून मोठा आवाज येत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिथे छापा टाकून डीजे बंद केला आणि साहित्य जप्त केले. डीजे ऑपरेटर आणि बारच्या मॅनेजरला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.