रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज काही काळ वाहतुकीत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. कनेक्टिंग लिंकवरील देखभाल, दुरुस्ती आणि मॉकड्रीलच्या कामासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कनेक्टिंग लिंक मार्ग दुपारी तीन तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतूक नियोजनाची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 ते 3 या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरून पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील घाट मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
देखभाल-दुरुस्तीचे काम तसेच मॉकड्रील सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे. काम सुरू असताना संबंधित मार्गावर वाहनांची गर्दी होऊ नये आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कनेक्टिंग लिंकवरून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे प्रवास करणाऱ्या वाहनांना या बदलाचा थेट परिणाम होणार नाही. मात्र, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत जुन्या मार्गाचा वापर करताना अतिरिक्त प्रवासाचा वेळ लक्षात घेणे आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.