मुंबई: मुंबईतील घाटकोपर परिसरात समोर आलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. दुबईहून काही दिवसांपूर्वी मुंबईत परतलेल्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू हा बाथरूममध्ये घसरून झालेला अपघात नसून तो नियोजित खून असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या सासूसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, माजी मोलकरणीच्या कुटुंबाला तीन लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे.
मृत महिला सपना गंजी या घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर परिसरात राहत होत्या. त्या महिनाभरापूर्वी आपल्या मुलासह दुबईहून भारतात परतल्या होत्या. 16 ऑगस्टच्या रात्री त्यांचा बाथरूममध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदनापूर्वी मृतदेहाची पाहणी करताना पोलिसांना गळ्यावर संशयास्पद खुणा आणि डोक्याला गंभीर दुखापत दिसून आल्याने संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलली.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, संबंधितांची चौकशी आणि इतर माहितीच्या आधारे या मृत्यूमागे कट रचल्याचा संशय व्यक्त केला. चौकशी पुढे सरकताच सासू धनलक्ष्मी गंजी हिने माजी मोलकरीण आणि तिच्या कुटुंबीयांच्या मदतीने हत्या घडवून आणल्याचे समोर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा सपना घरात एकट्या होत्या. त्याच संधीचा फायदा घेत आरोपी घरात दाखल झाले. प्रथम त्यांच्या डोक्यावर काचेच्या वस्तूने वार करण्यात आला. त्यानंतर डोळ्यात मिरचीची पूड टाकून ओढणीच्या साहाय्याने गळा आवळल्याचा आरोप आहे. प्रतिकार सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर आणखी दोन आरोपींनी गळ्यावर दाब देत हत्या केल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे कुटुंबातील जुने वाद समोर आले. सासूच्या म्हणण्यानुसार सुनेविषयी काही वैयक्तिक आरोप आणि यापूर्वी दाखल झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणामुळे दोघांमध्ये दीर्घकाळ तणाव होता. याच पार्श्वभूमीवर कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पंतनगर पोलिसांनी धनलक्ष्मी गंजीसह माजी मोलकरीण मंगलाबाई जाधव, शिवानी जाधव, सुरेश जाधव आणि साजन जाधव या पाच आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून या हत्येतील आर्थिक व्यवहार आणि कटाचे इतर पैलू पोलिस तपासत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.