मुंबई: मुंबई आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवार, ३० ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर विविध देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल सेवांसह अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर कुठे असणार मेगाब्लॉक?
मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर रविवारी सकाळी ८ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत काही एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा साधारण १० ते १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.या मेगाब्लॉकचा परिणाम गोदान एक्स्प्रेस, जयनगर एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, काकिनाडा पोर्ट एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस, मुंबई मेल यांसह अन्य काही गाड्यांवर होणार आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने संबंधित गाड्यांच्या मार्गात आवश्यक बदल केले आहेत. त्यामुळे एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या गाडीची सद्यस्थिती आणि नियोजित मार्गाची माहिती आधी तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ट्रान्स-हार्बर मार्गावरही सेवांवर परिणाम
ठाणे आणि वाशी, नेरुळ तसेच पनवेल दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरही रविवारी मेगाब्लॉक राहणार आहे. सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या कालावधीत देखभाल कामे केली जाणार आहेत. या ब्लॉकमुळे ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेलदरम्यान अप-डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा काही काळ बंद राहतील. मात्र, बेलापूर-उरण मार्गावरील लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर रात्री जंबो ब्लॉक
दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही शनिवार-रविवारच्या मध्यरात्री वसई आणि भाईंदर स्थानकांदरम्यान जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक असेल. अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत, तर डाऊन जलद मार्गावर रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या काळात जलद लोकल गाड्या काही अंतरावर धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मात्र, रविवार, ३० ऑगस्ट रोजी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीची कामे प्रवासी सुरक्षेसाठी आवश्यक असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.