मुंबई : राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू असतानाच एमपीएससीचा पेपर फुटल्याने पुन्हा एकदा शिक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. दरम्यान, पेपरफुटीनंतर अन्न,औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द (FDA Drug Inspector Group-B Exam) करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 22 मार्च 2026 च्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्राथमिक चौकशीत एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आयोगाने ही भरती प्रक्रिया रद्द केली असून आता फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नसून फेरपरीक्षेसाठी कोणतंच शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, प्रेमप्रकरणातून MPSC चा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
22 मार्च, 2026 रोजी ही चाळणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेचा 12 जून, 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेअंती मुलाखतीकरिता 506 इतके उमेदवार पात्र ठरले. यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 जुलै, 2026 ते 22 जुलै 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. तर 22 जुलै,2026 रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदाकरिता पात्र ठरणाऱ्या 485 आणि अपात्र 3 अशा एकूण 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या उपरोक्त जाहिरातीतील पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. याकरिता संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच त्याकरिता कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. फेरपरीक्षेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.