मुंबई: मिरा-भाईंदरकर आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता लवकरच सुटका मिळणार आहे. मुंबईच्या वेगवान प्रवासाच्या नकाशात एक मानाचा तुरा रोवणारा, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीचा अनोखा संगम असलेला 'डबल डेकर' उड्डाणपूल आता उद्घाटनाच्या उंबरठ्यावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) साकारलेला हा प्रकल्प केवळ काँक्रीटचे बांधकाम नसून, प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचवणारा एक महत्त्वाचा 'महामार्ग' ठरणार आहे.
दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो लाईन 9 च्या मार्गावर उभारण्यात आलेला हा दुमजली उड्डाणपूल स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. एकाच खांबावर वरून धावणारी मेट्रो आणि खाली वाहणारी रस्ते वाहतूक, अशी ही रचना आहे. यामुळे जागेची बचत तर झालीच आहे, शिवाय मेट्रो आणि रस्ते वाहतूक या दोन्ही समस्यांवर एकाच वेळी तोडगा काढण्यात आला आहे. मिरा-भाईंदरमधील जुना पेट्रोल पंप ते फाटक मार्गावरील आझाद मैदानापर्यंत हा पूल विस्तारलेला आहे.
काही दिवसांपूर्वी या पुलाच्या रचनेवरून बरीच चर्चा आणि वादंग निर्माण झाले होते. चार पदरी असलेला हा पूल पुढे अचानक दोन पदरी होत असल्याने, तिथे 'बॉटलनेक' तयार होऊन पुन्हा कोंडी होईल की काय, अशी रास्त भीती नागरिकांनी व्यक्त केली होती. यावर सोशल मीडियावरून आणि प्रत्यक्षही MMRDA ला नागरिकांनी धारेवर धरले होते. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केल्यानुसार, ही अरुंद रचना सध्यातरी तात्पुरती असून, 2020-21 च्या मंजूर आराखड्यानुसार भविष्यात या पुलाचा रीतसर विस्तार केला जाणार आहे.
हेही वाचा: Bhiwadi Fire : भीषण अग्नितांडव, केमिकल फॅक्टरीला आग लागून सात कामगारांचा होरपळून मृत्यू
'अति घाई, संकटात नेई' हे ओळखून प्रशासनाने आता सावध आणि सुरक्षित पवित्रा घेतला आहे. पुलाच्या रचनेवर उपस्थित झालेले प्रश्नचिन्ह पाहता, आता एका त्रयस्थ संस्थेकडून (Third Party Audit) या पुलाची सखोल रस्ते सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, ही 'सेफ्टी टेस्ट' यशस्वी झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. विशेष म्हणजे, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हा पूल एकाच वेळी पूर्ण न उघडता टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
मिरा-भाईंदरमधील 'गोल्डन नेस्ट सर्कल' हे वाहतूक कोंडीचे माहेरघर बनले होते. मात्र, हा उड्डाणपूल याच महत्त्वाच्या चौकावरून जात असल्याने येथील कोंडी फुटण्यास मोठी मदत होईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रोडवरील वाहनांचा ताणही यामुळे हलका होणार आहे. केवळ उत्तर-दक्षिणच नव्हे, तर हा प्रकल्प शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडून भाईंदर पूर्वेपर्यंत जाणाऱ्या या 970 मीटर लांबीच्या पुलामुळे, मिरा-भाईंदरकरांचा पूर्व-पश्चिम प्रवास आता विनासायास होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.