सातारा : वाई येथील एमआयडीसी परिसरात मध्यरात्री 'बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्याला' अचानक भीषण आग लागली. कारखान्यातील केमिकल आणि रंगाच्या ज्वलनशील डब्यांमुळे आग झपाट्याने पसरली, ज्यामुळे लाखोंच्या गणेशमूर्ती जळून खाक झाल्या. वाई नगरपालिकेसह परिसरातील अग्निशामक बंबानी सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. गणेशोत्सव तोंडावर असताना घडलेल्या या दुर्घटनेत मोठी आर्थिक हानी झाली असली, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली असून नेमकी ही आग कोणत्या कारणातून लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
‘बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्या’मध्ये रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग भडकली. आगीची माहिती मिळताच वाई नगरपालिकेसह गरवारे वॉलरॉक्स, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण सातारा पालिका आणि किसन वीर साखर कारखान्याचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटेच्या सुमारास आग नियंत्रणात आली. कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पेंटिंगचे रंगाचे डबे, थिनर आणि इतर रसायने (केमिकल) साठवलेली होती. या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मदतीसाठी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे बावळेकर कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक तयार मूर्ती जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.