Weather Alert: 2 दिवसांच्या उकाड्यानंतर आज महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी; राज्यात कोणता अलर्ट जारी?

महाराष्ट्रात पुन्हा थंडीने जोर धरला असून मुंबई, पुणे, कोकणात गारवा वाढला आहे.
Weather Alert: 2 दिवसांच्या उकाड्यानंतर आज महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी; राज्यात कोणता अलर्ट जारी?

Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिवाळ्याचा जोर वाढू लागला असून नगर, नाशिकसह राज्यातील अनेक भागांत सकाळच्या वेळेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठे चढउतार होत असल्याने हवामान विभाग सतत निरीक्षण ठेवून आहे. दरम्यान, विदर्भातील काही जिल्ह्यांना रविवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या थंडीने हजेरी लावली आहे. दिवसा उबदार वातावरण असले तरी पहाटे आणि रात्री गारवा जाणवतोय. मुंबईत किमान तापमान 19 डिग्री सेल्सियसच्या आसपास तर कमाल तापमान 30 ते 31 डिग्री सेल्सियस दरम्यान राहील, असा अंदाज आहे. पालघर परिसरात तापमान आणखी खाली घसरत असून सकाळच्या वेळी थंडीची तीव्रता जास्त भासतेय. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही 17 ते 19 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान स्थिरावले असून संध्याकाळी पुन्हा गारवा जाणवतो.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या उपनगरांत वातावरण शांत असून वारा थंड आहे. गेल्या दोन दिवसांत ढगाळ वातावरणाची चिन्हे दिसली होती; मात्र आज आणि पुढील एक-दोन दिवस पावसाचा प्रश्न नाही. हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ राहण्याची शक्यता असून सकाळी बाहेर पडल्यानंतर थंडीचा नक्कीच परिणाम जाणवेल.

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात मोठा बदल दिसतोय. पुण्यात मागील काही दिवसांत तापमानात चढउतार दिसून आले असले तरी, आज हवामान स्थिर राहील. सकाळचे तापमान 15–17 डिग्री सेल्सियसपर्यंत खाली जाऊन दिवसा 30 डिग्रीपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. बारामती आणि आसपासच्या भागांतही हवा कोरडी आणि रात्री गार राहील.

विदर्भात थंडीची लाट कायम आहे. नागपूर, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांत सकाळी तापमान एक अंकी पातळीला स्पर्श करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि वरिष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. धुळे, जळगाव, नंदुरबार यांसारख्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. काही भागांत तापमान 12 डिग्री सेल्सियसच्या खाली घसरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

एकूणच राज्यभर सध्या हिवाळ्याचा वारा अधिक जाणवतोय. पुढील काही दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी गरजेप्रमाणे उबदार कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून केले जात आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version