पिंपरी चिंचवड : आयटी हब हिंजवडीतील सुप्रसिद्ध फलाहार रेस्टॉरंटमध्ये अन्न अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाला पावभाजीसोबत दिलेल्या काकडीच्या स्लाइसमध्ये जिवंत अळी आढळून आली आहे. ग्राहकाने हा धक्कादायक प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर रेस्टॉरंटच्या अस्वच्छ अन्नपदार्थांच्या पद्धतीवरून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. नागरिक आता अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) या आस्थापनेवर कडक कारवाईची मागणी करत असून, हिंजवडी परिसरातील हॉटेलमध्ये पाळल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकारानंतर पुन्हा एकदा ग्राहकांच्या रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांच्या दर्जेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यापूर्वीही अन्न पदार्थांमध्ये विविध कीटक आढळून आल्याची घटना समोर आल्या आहेत. मुंबईतील वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये जेवणात उंदीर आढळ्याचे समोर आले होते. तर रेल्वेच्या प्रवासात मिळणाऱ्या जेवणातही अळी, झूरळ सापडल्याचे पाहिले आहे. तसेच घाटकोपरमधील नामांकीत मॉलच्या आईसक्रीम पार्लमध्ये उंदीर फिरत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शिवाय जेवणात पाल आढळून आल्याच्याही अनेक घटना आहेत. त्यामुळे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या अन्न पदार्थांच्या दर्जेची काळजी घेणे आता महत्त्वाचे ठरत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.