लातूर शहरात स्वतःच्या घरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या बहुमजली खासगी रुग्णालयात शासकीय सेवेत ‘वैद्यकीय अधीक्षक’ पदावर कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने अनधिकृतपणे खासगी व्यवसाय केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रुग्णालयात एका 30 वर्षीय महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय निष्काळजीपणामुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी संबंधित महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेणापूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिता बब्रुवान अलगुले यांनी शासकीय सेवेत कार्यरत असतानाच लातूर शहरातील अहिल्याबाई होळकर चौक परिसरातील स्वतःच्या घरातील बहुमजली इमारतीत ‘रेड्डी मॅटर्निटी हॉस्पिटल’ नावाने खासगी रुग्णालय सुरू केले होते. हे रुग्णालय मागील काही महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
याच रुग्णालयात ज्योती शिशुपाल वलसे या 30 वर्षीय महिलेची 9 ऑगस्ट 2026 रोजी प्रसूतीसाठी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, संबंधित खासगी रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णाला पुढील उपचारांसाठी लातूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील डॉ. सचिन सगर यांच्या ‘गुरुमाऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मयत ज्योती वलसे यांच्या आईने लातूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुजाता पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून प्रकरणाची चौकशी केली.
चौकशीदरम्यान डॉ. अनिता अलगुले यांनी व्यवसायरोध भत्ता (NPA – Non-Practicing Allowance) घेत नसल्याबाबत खोटा लेखी जबाब देऊन चौकशी समितीची दिशाभूल केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2022 च्या शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नियमबाह्य इमारतीत नोंदणी नसलेले रुग्णालय आणि शस्त्रक्रियागृह सुरू करून तेथे महिलेची सिझेरियन शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुजाता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. अनिता अलगुले यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 125 तसेच बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट, 1949 च्या कलम 8 अंतर्गत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच आरोपी डॉ. अनिता बब्रुवान अलगुले फरार झाल्या असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
या घटनेमुळे लातूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील गंभीर बाबी समोर आल्या असून, शासकीय सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसाय करत असताना त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आणि यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.