Samantha Prabhu Mobbed By Fans: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिला हैदराबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांच्या अतिउत्साहाचा फटका बसला आहे. एका स्टोअर लॉन्चसाठी पोहोचलेल्या समंथाला पाहण्यासाठी चाहत्यांनी इतकी प्रचंड गर्दी केली की, परिस्थिती सुरक्षा रक्षकांच्या हाताबाहेर गेली. या गोंधळात काही लोकांनी समंथाच्या साडीचा पदर ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकी घटना काय?
समंथा हैदराबादमधील एका ज्वेलरी स्टोअरच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आली होती. तिने काळ्या रंगाची सिल्क साडी आणि डिझाइनर ब्लाउज परिधान केला होता, ज्यामध्ये ती अत्यंत देखणी दिसत होती. मात्र, कार्यक्रम संपवून बाहेर पडताना चाहत्यांनी तिला घेराव घातला. तिने आपल्या कारपर्यंत पोहोचावे यासाठी सुरक्षारक्षक वाट करून देत होते, पण गर्दी इतकी बेफाम झाली की लोक एकमेकांवर पडू लागले. याच धक्काबुक्कीत गर्दीतील काही लोकांनी तिची साडी ओढल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
समंथाने संयमाने परिस्थिती हाताळली
अशा कठीण प्रसंगातही समंथाने आपला संयम ढळू दिला नाही. तिने अतिशय शांतपणे त्या गर्दीतून स्वतःला सावरले आणि ती कारपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून नेटिझन्सनी चाहत्यांच्या या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Dhurandhar Worldwide Collection: ‘धुरंधर’ चे निर्माते झाले मालामाल! भारतात 500 तर जगभर ‘इतक्या’ कोटींची कमाई
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने म्हटले, लोक इतके विचित्र कसे असू शकतात? अभिनेत्रीची प्रायव्हसी आणि सुरक्षिततेचा विचार कोणीच का करत नाही? तर दुसऱ्याने चाहत्यांच्या या वागणुकीचा निषेध करत त्यांना शिस्त पाळण्याचा सल्ला दिला आहे.
निधी अग्रवालसोबतही घडली होती अशीच घटना
काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या ‘द राजा साब’ चित्रपटातील गाण्याच्या लाँचिंग दरम्यान अभिनेत्री निधी अग्रवाल हिलादेखील अशाच भीषण गर्दीचा सामना करावा लागला होता. निधीला झालेल्या त्रासानंतर त्या प्रकरणात कायदेशीर कारवाईदेखील करण्यात आली होती. आता समंथासोबत घडलेल्या या प्रकारामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.