Jalgaon: प्रसूतीदरम्यान आई आणि नवजात बाळाचा मृत्यू; महिलेच्या भावाचे गंभीर आरोप, ‘ तिचं डायलिसिस…

जळगावातील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिला आणि नवजात बाळाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी डायलिसिस न केल्याचा आरोप केला असून डॉक्टरांनी सर्व आरोप फेटाळत प्रकृती आधीपासून गंभीर असल्याचे सांगितले.
Jalgaon: प्रसूतीदरम्यान आई आणि नवजात बाळाचा मृत्यू; महिलेच्या भावाचे गंभीर आरोप, ‘ तिचं डायलिसिस…

जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिला आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत रुग्णालयात गोंधळ घातला. तर रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत महिलेची प्रकृती आधीपासूनच अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील योगिता पासी यांना प्रसूतीसाठी जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना प्रसूतीदरम्यान योगिता आणि त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली.

मृत महिलेचे भाऊ आकाश पासी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, योगिता यांच्या प्रकृतीनुसार त्यांना डायलिसिसची गरज होती. मात्र, वेळेत डायलिसिस न केल्यामुळे त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. उपचारात निष्काळजीपणा झाल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, महिला आणि बाळाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

या सर्व आरोपांवर रुग्णालयातील डॉक्टरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, योगिता यांची प्रकृती रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीपासूनच अत्यंत चिंताजनक होती. त्यांच्या आरोग्याशी संबंधित अनेक गुंतागुंती असल्याची माहिती उपचार सुरू करण्यापूर्वीच नातेवाईकांना देण्यात आली होती.

डॉक्टरांनी पुढे सांगितले की, प्रसूतीदरम्यान महिलेच्या हृदयाची गती अचानक मंदावली, तर बाळाचे हृदयही अचानक बंद पडले. त्यामुळे दोघांचेही प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. तसेच ऑपरेशनपूर्वी डायलिसिसची आवश्यकता नव्हती, असा दावाही डॉक्टरांनी केला आहे.याशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरोधात नातेवाईकांनी रुग्णाला काही काळासाठी घरी नेल्याचाही दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात नातेवाईकांनी उपचारातील हलगर्जीपणाचा आरोप केला असला, तरी रुग्णालय प्रशासनाने तो स्पष्टपणे नाकारला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि सर्व आरोपांची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version