शिवसेनेच्या उद्धव गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला मनासारखं काम मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आपण राजीनामाचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे असे शिशिर शिंदे यांनी सांगितले. १९ जून २०१८ रोजी शिशिर शिंदे यांची मनसेतून शिवसेनेत घरवापसी झाली होती.
“चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते.” असे शिशिर शिंदे यांनी म्हटले
पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. १९ जून २०१८ साली शिशिर शिंदे यांची शिवसेनेत घरवापसी झाली होती. घरवापसीनंतर ४ वर्ष त्यांना राजकीय पुनर्वसनासाठी वाट पाहावी लागली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिशिर शिंदे यांची पक्षाच्या उपनेतेपदी वर्णी लागली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातल्या घडामोडींमध्ये शिशिर शिंदे यांना उपनेते करण्यात आलं होतं.
राजीनामा देताना शिशिर शिंदे यांनी काय लिहिलं?
राजीनामा देताना शिशिर शिंदे यांनी लिहिले की, “दि. १९ जून २०१८ रोजी मी अतिशय आत्मीयतेने शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर ४ वर्षांत ३० जून २०२२ पर्यंत मला कोणतीही जबाबदारी मिळाली नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची काही ओळख असते. कार्यकर्त्याचे काही गुण असतात. परंतु या चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते.
माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. ३० जून २०२२ रोजी माझी “शिवसेना उपनेते” म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले. असो. मी आजपासून शिवसेनेच्या उपनेतेपदाचा व पक्षाचा राजीनामा देत आहे. माझ्या कोणत्याही कृत्यामुळे शिवसेनेची बदनामी किंवा अप्रतिष्ठा झाली नाही हे मात्र मी निश्चयपूर्वक अभिमानाने नमूद करतो गेल्या सहा महिन्यांत आपली भेट होणे देखील अशक्य झाले. आपण कोणाला नकोसे होणे माझ्या संवेदनशील मनाला मुळीच रुचत नाही. माझी घुसमट मीच थांबवतो. या पत्राद्वारे कोणतेही जाहीर दोषारोप न करता मी आपणास ‘जय महाराष्ट्र’ करतो.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.