जागतिक फुटबॉलची शिखर संस्था असलेल्या फिफाने भारतीय फुटबॉल महासंघा वर मोठी कारवाई केली आहे. महासंघात होणाऱ्या हस्तक्षेपाचे कारण देत फिफाने भारताला तातडीने निलंबित केले आहे. फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय फुटबॉल महासंघाच्या कारभारात तिसऱ्या पक्षाकडून होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला फिफाने महासंघाला तसा इशारा देखील दिला होता. हा इशाला देताना या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या १७ वर्षाखालील महिलांच्या फुटबॉल वर्ल्डकपचे आयोजकपद काढून घेण्याचा धमकी फिफाने दिली होती.
विशेष म्हणजे फिफाने दिलेला इशारा हा सर्वोच्च न्यायालयाने महासंघाच्या निवडणुकी संदर्भात दिलेल्या आदेशानंतर काही दिवसांनी देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकिय समितीकडून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी निवडणुका होणार आहे.
फिफाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, फिफा कौन्सिलच्या ब्युरोने एकमताने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला “अनावश्यक हस्तक्षेप” साठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे फिफाच्या नियमांचे उल्लंघन आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबॉल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले. फिफा निवेदनात म्हटले आहे की निलंबनाचा अर्थ असा आहे की ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ दरम्यान भारतात होणारा फिफा U-१७ महिला विश्वचषक २०२२ देखील होणार नाही. भारतीय क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात असून या प्रकरणात सकारात्मक परिणाम मिळू शकेल अशी आशा फिफाने व्यक्त केली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, फिफाने तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपासाठी एआयएफएफला निलंबित करण्याचा इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाने भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारणीच्या निवडणुका घेण्याच्या निर्देशानंतर काही दिवसांतच हा इशारा देण्यात आला होता. २८ ऑगस्ट रोजी AIFF च्या निवडणुका होणार आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.