प्रफुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर शहरात महिलेची आरोग्य सेवेअभावी रस्त्यावर प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेहकर शहरातील ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावर एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरात घडली. प्रसूतीच्या वेदनांनी महिला रस्त्यावर विव्हळत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिला आहे. रुग्णालयात डॉक्टर नसल्याचे सांगत त्या नर्सने महिलेच्या मदतीसाठी येण्यास नकार दिला. त्यामुळे स्थानिकांनी खासगी रुग्णालयातील आरोग्य सेविकेला बोलावून या महिलेची अर्धवट झालेली प्रसूती करवून घेतली. या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या गावातच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे पाहायला मिळाल आहे. या संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक नागरिकी योगेश सौभागे यांनी दिली.
काय आहे नेमकं प्रकरण
या घटनेमुळे पुन्हा एकदा शासकीय रुग्णालयांच्या अनास्थेची संतापजनक घटना समोर आली आहे. हलगर्जीत अग्रस्थानी असलेल्या आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक काळवंडलेला चेहरा उघडा पडलायं. मेहकरमध्ये ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या 50 ते 100 मीटर अंतरावर एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाली. प्रसूतीच्या वेदनेने महिला रस्त्यावर तडफडत होती. बाळाचा अर्धा भाग बाहेर आला होता. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीस थेट नकार दिला. ‘डॉक्टर नाहीत, मी एकटीच आहे,’ असं सांगत या परिचारिकेने रुग्णालयातून बाहेर पडण्यास नकार दिला. शेवटी एका खासगी रुग्णालयातील परिचारिका आणि स्थानिक महिलांच्या तत्परतेमुळे बाळाचा आणि आईचा जीव वाचला. प्रशासनाच्या या अमानुष आणि बेजबाबदार कारभारावर आता नागरिकांचा तीव्र संताप उसळला आहे.
हे चित्र आहे आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराचं! ही घटना घडलीय मेहकर शहरात. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास एका गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. घरात दुसरं कुणीही नसल्याने ही महिला वेदनेने विव्हळत रुग्णालयाच्या दिशेने निघाली. पण, अवघ्या 50 मीटर अंतरावर ही महिला ओट्यावर कोसळली. प्रसूतीची वेळ अत्यंत कठीण टप्प्यावर पोहोचली होती. स्थानिक नागरिक योगेश सौभागे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून थेट मेहकर ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. तिथे ड्युटीवर असलेल्या स्टाफ नर्सकडे मदतीची गयावया केली, “बाईची प्रसूती रस्त्यावरच होतेयं, बाळ अर्धे बाहेर आले आहे, तातडीने चला!” अशी विनंती केली. पण शासकीय सेवेचा माज दाखवत त्या नर्सने मदतीस साफ नकार दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.