सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. बार्शी-परंडा रोडवर भरदिवसा पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. संशयातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटील आणि धनश्री पाटील हे दोघेही एका खासगी बँकेत कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेमविवाह केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी बार्शी-परंडा रोडवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद अचानक चिघळल्यानंतर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीवर तब्बल 50 वार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गंभीर जखमी झालेली धनश्री रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या घटनेदरम्यान काही नागरिकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नागरिकांनाही धमकावत मागे हटवल्याचं सांगितलं जात आहे.घटनेनंतर आरोपी ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
तर दुसरीकडे नागपूर शहरातून नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या भावानेच आपल्या लहान भावाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप बाबुले असे मृत तरुणाचे नाव असून भगवान बाबुले असे आरोपी भावाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघेही भाऊ फर्निचरचे काम करून उदरनिर्वाह करत होते.
दरम्यान, प्रदीपला नुकतेच कामाचे साडेपाच हजार रुपये मिळाले होते. त्याने हे पैसे घरात ठेवले होते. मात्र काही वेळानंतर घरी परतल्यावर पैसे जागेवर नसल्याचे त्याच्या लक्षात आले. यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात भगवान बाबुले याने घरातील लाकडी काठी उचलून प्रदीपच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात प्रदीप गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्यात अशा वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.