गेला एक महिना पावसाने राज्यात विश्रांती घेतली, त्यानंतर आता पुन्हा सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतो आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघा एक दिवस उरलेला असताना मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
याचा फटका गणपतीचे मंडप आणि रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सजावटीला बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका बसताना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. अशातच आता अचानक जोर धरलेल्या पावसामुळे चाकरमण्यांच्या प्रवासात देखील अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
अनेक दिवसांच्या कोरड्या काळानंतर आलेल्या या दमदार पावसामुळे भक्तांना दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. यादरम्यान भारतीय हवामान विभागानुसार 11 ते 14 सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू आहे. 15 सप्टेंबरनंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मुंबई आणि कोकणात पावसाची शक्यता कायम असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरींसह वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस बसायला सुरुवात झालीये मात्र जिल्ह्यातील 70 टक्क्यापेक्षा अधिक पिकं आधीच करपून गेलेली असल्यानं उर्वरित केवळ 30 टक्के पिकांनाच या पावसाचा फायदा होणार आहे. त्यातही सोयाबीन पिकाची दाणे भरण्याची अवस्था निघून गेल्यानं उत्पन्नात मोठी घट होणार आहे. जिल्ह्यातील कारंजा,मानोरा, मंगरुळपीर, वाशिम, मालेगाव या तालुक्यात तब्बल 40 ते 45 दिवसानंतर पाऊस बरसला तर रिसोड तालुक्यात 25 दिवसानंतर पावसाचा आगमन झाल आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.