Weather Alert : पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे; वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट? जाणून घ्या

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन.
Weather Alert : पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे; वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  जाणून घ्या

Monsoon: राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव अधिक तीव्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह अधूनमधून जोरदार सरी कोसळत असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. हवामान विभागाने 26 जूनसाठी राज्यातील तब्बल 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

कोकण विभागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या सरी पडण्याची शक्यता आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला असून येथे वादळी वाऱ्यांसह पावसाचा प्रभाव जाणवू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. पुणे, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. या भागांमध्ये अचानक पावसाचा जोर वाढू शकतो. पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली असून या विभागात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि नाशिक घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणीही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून नागरिकांनी सावध राहण्याचे सांगितले आहे. उर्वरित काही जिल्ह्यांमध्ये तुलनेने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस राज्यभर पावसाची स्थिती कायम राहणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व शेतीच्या कामांमध्ये हवामानाचा विचार करून निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यांमध्ये सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version