मुलीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आणि त्यामुळे समाजात बदनामी होण्याच्या भीतीमुळे मालेगावात जन्मदात्या आईनेच मुलीच्या जेवणात झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या. वडिलांनी हातपाय दाबून ठेवले, तर निर्दयी चुलतभावाने थंड डोक्याने सतरा वर्षीय नेहाचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेतील मृत तरुणीच्या संशयास्पद मृत्यूचा पोलिसांना निनावी फोन आल्यामुळे त्यांनी मुलीच्या नातेवाईकांच्या विरोधानंतरही सरणावरील मृतदेह थेट शवगृहात हलवल्याने हा हॉरर किलिंगचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
याप्रकरणी वडील शरद सखाराम चौधरी, आई सुनीता शरद चौधरी आणि चुलतभाऊ नीलेश मधुकर चौधरी या संशयितांना छावणी पोलिसांनी अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
कलेक्टरपट्टा भागातील इंद्रायणी कॉलनीत राहणाऱ्या नेहा शरद चौधरी या तरुणीचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. कुटुंबियांनी मंगळवारी सकाळी अंत्ययात्रा काढून श्रीरामनगर अमरधाममध्ये पार्थिव आणले. पार्थिव सरणावर ठेवून अग्निदहनाची तयारी सुरू असतानाच छावणी पोलिसांचे पथक तातडीने स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. पोलिसांच्या या भूमिकेस नातेवाइकांनी विरोध केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
थंड डोक्याने करण्यात आलं हत्येचं नियोजन
नेहाचा वाढदिवस 2 ऑक्टोबरला असल्याने ती काही मित्रांसह चंद्रेश्वरी येथे फिरण्यास गेल्याची माहिती तिच्या परिवाराला मिळाली. तिचे एका मुलाशी प्रेमसंबंध असल्याचंही कुणीतरी तिच्या वडिलांना सांगितलं.
हे कळताच संतापल्याने शरद चौधरी याने आपली पत्नी सुनीता हिला झोपेच्या गोळ्या आणण्यास सांगितलं.
झोपेच्या वीस गोळ्या नेहाला जेवणातून देण्यात आल्या.
गोळ्यांमुळे नेहा काही वेळातच झोपी गेली.
वडील शरद यांनी पुतण्या नीलेश चौधरीला फोन करून घरी बोलावून घेतलं.
यानंतर आईने हात, वडिलांनी पाय दाबून ठेवले, तर नीलेशने पूर्ण ताकदीनिशी नेहाचा गळा आवळून तिची हत्या केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं.
नेहाला पुसटशी कल्पनाही येणार नाही याची खबरदारी घेत अगदी शांत डोक्याने आई-वडिलांनीच हत्येचे नियोजन केले होते.
पोलिसांची तत्परता
एका निनावी फोनची दखल घेत पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे खुनाचा छडा लागला.
स्मशानभूमीत पोहोचण्यास दहा मिनिटं जरी उशिरा झाला असता, तरी नेहाचे पार्थिव मिळाले नसते.
पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने फिरवून संशयितांना तत्काळ ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.