गणेशोत्सवात गौरी आवाहन आणि गौरी पूजन हे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण विधी मानले जातात. या दरम्यान गणरायांच्या शेजारी गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. कोकणासह अनेक भागात बऱ्याच घरांमध्ये गौरी-गणपती एकत्र बसवले जातात, तर काही ठिकाणी फक्त बाप्पाचीच स्थापना असते. ज्या घरांमध्ये गौरी-गणपती असतात, तिथे हे दोन्ही विधी मोठ्या भक्तिभावाने पार पाडले जातात. मात्र अनेकांना नेहमीच संभ्रम पडतो की, गौरी आवाहन आणि गौरी पूजन यात नेमका फरक काय आहे? ते कधी असते आणि त्यामागची परंपरा काय आहे? तर चला, याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात.
उद्या, 17 सप्टेंबर रोजी सर्वत्र गौरी आगमनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. या दिवशी गौरीला मोठ्या थाटामाटात घरात आणले जाते. गौरीच्या आगमनाची परंपरा अतिशय सुंदर आहे. गौरीचे मुखवटे परातीत घेऊन, कुंकवाची पावले काढत, तुळशीजवळ तिची पूजा करून मग तिला घरात प्रवेश दिला जातो. त्यानंतर गौरीला आसनावर विराजमान करून पहिल्या दिवशी तिला खास नैवेद्य दाखवला जातो.
गौराई येते माहेराला – तीन दिवसांचा थाट!
गौराई आपल्या माहेरी, म्हणजेच आपल्या घरी तीन दिवसांसाठी येते. या तीन दिवसांत तीन खास सोहळे असतात.
पहिला दिवस (17 सप्टेंबर) – गौरी आवाहन, ज्या दिवशी गौरीला मोठ्या प्रेमाने घरात घेतलं जातं.
दुसरा दिवस (18 सप्टेंबर) – गौरी पूजन, या दिवशी खऱ्या अर्थाने तिची पूजा, हळदी-कुंकू आणि खास नैवेद्य असतो.
तिसरा दिवस (19 सप्टेंबर) – गौरी विसर्जन, जड अंतःकरणाने तिला निरोप देण्याचा दिवस.
गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त
यंदा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 17 सप्टेंबर, गुरुवारी असून, संध्याकाळी 7 वाजून 52 मिनिटांपर्यंत गौरीला घरात घेण्याची शुभ वेळ आहे.
गौरी आगमनासाठी लागणारं साहित्य
गौराईला घ्यायला जाताना परात रिकामी नको! परातीत गहू भरून घ्या, त्यात गणपती म्हणून सुपारी ठेवा. गौरीच्या डोक्यावर ठेवण्यासाठी नवीन ब्लाऊजपीस, तिच्यासमोर ठेवण्यासाठी पानांचे विडे, आणि तिच्या ओटीसाठी बांगड्या, मंगळसूत्र, हळद-कुंकू आणि सारं शृंगाराचं सामान आवर्जून घ्या.
पहिल्या दिवशी गौरीला नैवेद्य काय दाखवावा?
घरात आल्यावर गौरीला छान सजवलं जातं, तिच्यासमोर सुंदर आरास केली जाते. संध्याकाळी तिची मनोभावे आरती होते आणि या पहिल्या दिवशी तिला साधा पण सात्विक भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. यातही शेपूच्या भाजीला विशेष मान आहे. पण शेपू मिळाली नाही तरी हरकत नाही, कोणतीही हिरवी पालेभाजी आणि गरम भाकरीचा नैवेद्य गौरीला तितक्याच प्रेमाने दाखवू शकता.
गौरी शृंगाराचे सामान
गौराई म्हटलं की डोळ्यासमोर येते ते भरजरी साडी नेसलेलं, नटलेलं-सजलेलं रुप! गौराई नेहमी जोडीने येते, त्यामुळे तिचा शृंगारही दोघींसाठी सारखाच घ्यावा. छान भरजरी साडी, चमचमणारे दागिने, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, टिकली, सुवासिक गजरा असा सगळा साज करून आपल्या गौराईला अगदी नवरीसारखं सजवावं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.