शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पुन्हा एकदा अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झालाय. राज्याच्या अनेक भागात गारपिटीने उभं पिक आडवं केलंय.  अकोला, बुलडाणा, वाशिम आणि जालनात अवकाळी पाऊस आणि गारपीट पडली. अकोल्यातल्या बाळापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावलीय. यामुळे कांदा, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालंय. बुलडाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या…चिखली, कालेगाव, डोंगर शेवळीत गारांचा पाऊस झाला. वाशिम आणि जालनातही गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली. या ठिकाणी दोघांचा बळी गेला.

अस्मानी सुलतानी संकटामुळे शेतकरी नेहमीच गांजलेला असतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी. आता थोडं कुठे बरे दिवस येण्याची आस वाटत असतानाच गारपिटीनं झोडपलंय. मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाचा फटका बसलाय.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात गारपिटीनं थैमान घातलंय. गहू, ज्वारी आणि मिरचीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर बीड जिल्ह्यातल्या गेवराई, माजलगाव, शिरूर तालुक्यातला शेतकरी अडचणीत सापडलाय. तूर,ज्वारी,हरभरा ,कांदा, कापूस पिकांचं पूर्ण नुकसान झालंय.

लातूरमध्ये झालेल्या गारपिट, वादळ आणि पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. कुंटेफल, माटेफल आणि भिसेवाघोली आणि परिसरात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट झाला. बोरगावमध्ये वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झालाय. गारपिटीमुळे आंबा , ज्वारी , गहू , हराभरा , आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version