Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाचा सहावा दिवस; मुंबई-ठाण्यात बाप्पाला भावपूर्ण निरोप, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवशी मुंबई-ठाण्यात घरगुती गणपती आणि गौरींचे भावपूर्ण विसर्जन झाले. गिरगाव चौपाटीसह विविध घाटांवर भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.
Ganesh Visarjan: गणेश विसर्जनाचा सहावा दिवस; मुंबई-ठाण्यात बाप्पाला भावपूर्ण निरोप, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असल्याने गणेश विसर्जनाच्या सहाव्या दिवशी मुंबई, ठाणे आणि परिसरातील विविध विसर्जन घाटांवर भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि भाविकांच्या डोळ्यांत दाटलेलं पाणी अशा वातावरणात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मुंबईतील स्वराज्यभूमी गिरगाव चौपाटीवरही घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. भाविकांनी पारंपरिक पद्धतीने आरती करत बाप्पाला निरोप दिला. विसर्जन सुरळीत आणि सुरक्षित पार पडावे यासाठी महापालिका आणि प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली होती.

गिरगाव चौपाटीवर १२ कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आले होते. सुमारे एक हजार महापालिका कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सुरक्षेसाठी २० वॉचटॉवर आणि २२ तराफे सज्ज ठेवण्यात आले होते. याशिवाय तीन रुग्णवाहिका आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधाही उपलब्ध होती.

भाविकांच्या सोयीसाठी ९० तात्पुरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि २२ निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. रात्रीच्या विसर्जनासाठी फ्लडलाईट आणि सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली होती. समुद्रातील सुरक्षेसाठी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी एमएस प्लेट्स, क्रेन आणि विशेष यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली होती.

१९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार एकूण ३०७ गणेशमूर्ती आणि गौरींचे विसर्जन झाले. यामध्ये चार सार्वजनिक गणपती, २७० घरगुती गणपती आणि ३३ गौरींचा समावेश होता. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ठाण्यातील कोपरी विसर्जन घाटावरही गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांसाठी आरतीचा डोम, महाप्रसाद आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. महानगरपालिका, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफची पथकेही सुरक्षेसाठी तैनात होती.

दरम्यान, वसई-नायगाव परिसरातील उमेला गावात गणपतीला पालखीत विराजमान करून मिरवणुकीतून विसर्जन करण्याची सुमारे १५० वर्षांची परंपरा यंदाही जपण्यात आली. पुरुषांसोबत महिलांनीही पालखी उचलत बाप्पाला निरोप दिला.

सहाव्या दिवशी झालेल्या या विसर्जनामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण होते. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत भाविकांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version