नेपाळच्या उत्तर भागात अचानक आणि विनाशकारी पूर आला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याफ्रुबेसी भागात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भोटेकोशी नदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नेपाळमधील महापुरामध्ये हजारो लोक बेपत्ता झाले असून यात आता महाराष्ट्रातील काही रहिवासी देखील अडकल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले 4 जण अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून 4 जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. यात्रा करून ते परत येत होते. पण अचानक नेपाळमधील रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामध्ये जिलोंग सिटीमध्ये महाराष्ट्रातील 4 जण अडकले आहे. यामध्ये स्मिता पाटील, योगिनी पाटील, दिनेश भोसले आणि पूजा भोसले अशी अडकलेल्यांची नाव आहे. तसेच हे चारही जण संपर्कामध्ये असून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन: 1070 (टोल-फ्री क्रमांक)
•नियंत्रण कक्ष +91-9321587143
•अधिकृत ई-मेल: controlroom@maharashtra.gov.in
महाराष्ट्रातील नागरिक कुठे अडकले असतील, तर त्यांनी खालील लिंकवर आपली माहिती अपलोड करावी.
https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/
तिबेट सीमेजवळील रसुवा भागात आज, बुधवारी सकाळी 'भोटे कोशी' नदीला अचानक पूर आल्यामुळे सुमारे 500 लोकं बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 100 हून अधिक भारतीयांचा समावेश आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुराचा तडाखा बसलेल्या भागांतून आतापर्यंत 95 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, बाधित क्षेत्रातील विविध भागांतून किमान 93 जणांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, हिमालयातील या देशात आलेल्या विनाशकारी अचानक पुरामुळे किमान 95 जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी एकता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. दरम्यान नेपाळमधील डोंगराळ भागात आणि वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळमधून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने भारतातील बिहार राज्यावर पुन्हा एकदा पुराची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.