NCP Raigad News : रोह्यात राजकीय खेळी! शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; तालुक्यातील समीकरणे बदलणार

NCP Raigad News : रोह्यात राजकीय खेळी! शिवसेनेच्या माजी तालुकाप्रमुखाचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; तालुक्यातील समीकरणे बदलणार

रायगड : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. आज, शुक्रवारी शिवसेना (शिंदे गट) चे माजी तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.  खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. दरम्यान, ॲड. शिंदे म्हणाले की, “माझ्यावर झालेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. एक जरी आरोप सिद्ध झाला, तर मी कायमचे राजकारण सोडून देईन. कर नाही त्याला डर कशाला,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा : BMC Corporator : AIMIM च्या आणखी एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द, मुंबई महापालिकेत सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला

पक्षातील काही नेत्यांनी दिलेले शब्द न पाळणे, विकासकामांसाठी अपेक्षित सहकार्य न मिळणे आणि राजकीय पातळीवर सातत्याने झालेली उपेक्षा यामुळे आपण अस्वस्थ झालो होतो, असे सांगत त्यांनी अखेर सहा महिन्यांच्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत सुसंस्कृत राजकारण करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. गेल्या सहा महिन्यांत आपल्या राजीनाम्याबाबत आणि हकालपट्टीबाबत अनेक चर्चा रंगल्या. या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले. “रोहा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझे अंतिम ध्येय आहे. आता राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत विकासासाठी काम करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

तसेच, “ज्यांच्यासाठी संघर्ष केला, त्यांच्याकडूनच अविश्वास दाखवण्यात आला. ज्यांनी माझा विश्वासघात केला, त्यांना येणाऱ्या काळात त्याची राजकीय किंमत चुकवावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना त्यांनी त्यांना “राजकीय जादूगार” अशी उपमा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी रोहा नगरपालिकेतील मित्र, सहकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विकासकामांना नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
“मनोजकुमार शिंदे जे काम हातात घेतात, ते पूर्णत्वाला नेल्याशिवाय थांबत नाहीत. येणाऱ्या काळात माझे कामच माझी ओळख ठरेल,” असेही शिंदे म्हणाले. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version