अन्न सुरक्षा, स्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबविली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात दि. 11 ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट, ई-कॉमर्स आणि डेअरी आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच अन्न सुरक्षा व मानकांशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचे आढळून आल्याने 16 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे सोमवारपासून शाळांच्या परिसरात हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट (एचएफएसएस) अर्थात जंक फूड पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध विशेष कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे.
शाळेपासून 50 मीटर परिसरात एचएफएसएस पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध आहे. त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी शाळेच्या 50 मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री करू नये. या परिसरात एचएफएसएस पदार्थांची विक्री केल्याचे आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासनचे सह आयुक्त (अन्न), पुणे विभाग दि. वा. भोगावडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.