Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात घडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर किलोमीटर 36.500 जवळ हा अपघात झाला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा यात समावेश होता. या दुर्घटनेत ट्रक चालक आणि क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे निघालेल्या तांदळाच्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने पुढे जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारलाही फटका बसला. काही क्षणांतच तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल घेऊन जाणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.
या अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. मदतकार्य सुरू होईपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. अद्याप त्यांची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे, कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये लिलाबाई सस्ते (वय 80), मुकिंदा सस्ते (वय 56) आणि महेंद्र पाल (वय 39) यांचा समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक प्रशासन, महामार्ग पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.
अपघातामुळे ट्रकमधील तांदळाच्या पोत्यांसह कंटेनरमधील खाद्य तेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेनवरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक हळूहळू सुरळीत केली.
जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी महामार्ग पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.