जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात अंधश्रद्धेतून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. पत्नीच्या मृत्यूसाठी शेजाऱ्यांनाच जबाबदार धरत एका व्यक्तीने वृद्ध दांपत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सरावली परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नंतर तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास नामकोडा याच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. पत्नीच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारण नसून शेजारी राहणाऱ्या वृद्ध दांपत्याने जादूटोणा अथवा करणी केली असल्याचा संशय त्याने मनात बाळगला होता. याच संशयातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी विलासने शेजारी राहणारे सुरेश भुरकूड आणि गुलाब भुरकूड यांच्या घरात जाऊन त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. डोक्यावर आणि मानेवर वार झाल्याने वृद्ध दांपत्य रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हल्ला केल्यानंतर आरोपी विलास नामकोडा याने स्वतःही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आणि पुढील चौकशीबाबत पोलीस माहिती घेत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धेचा प्रभाव किती खोलवर आहे, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.