मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारकडून एक विशेष उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ असे या उपक्रमाचे नाव असून या अंतर्गत एका छताखाली शासनाची कामे होण्यासाठी जनतेकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सिंधुदूर्ग, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, पालघर या ठिकाणी या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले आहे. पण या कार्यक्रमावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या कार्यक्रमाचा जनतेला खरंच फायदा होत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अमळनेर येथून पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टींबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारने राज्यातील बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या पिकाला न मिळणारो दर यांकडे लक्ष दिले पाहिजे. सध्या शासन आपल्या दारी अशा प्रकारचे कार्यक्रम राबविले जात आहेत, त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. वास्तविक सरकारमधल्या प्रमुखांना कशा प्रकारे कार्यक्रम घ्यायचे, काय करायचे हा पूर्ण अधिकार आहे. पण त्या कार्यक्रमाचा खरंच सर्वसामान्य जनतेला फायदा होतो की नाही एवढे बघायची जबाबदारी सरकारची आहे. कारण जनतेचा पैसा आहे. तस होत नाही, असे म्हणत अजित पवारांनी या कार्यक्रमावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोल्हापूरमध्ये हा कार्यक्रम झाला. काल हा कार्यक्रम पालघरला झाला. असे वेगवेगळ्या भागामध्ये हा कार्यक्रम केला जात आहे. त्यामुळे साहाजिकच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या कार्यक्रमाला जाणार. म्हणजे शासनच तिथे जात. शासन येणार म्हटल्यावर मोठ्या प्रमाणावर अधिकारी तिथे येणार, असे सांगत अजित पवार म्हणाले की, आम्ही पण आमच्या काळामध्ये जनता दरबार किंवा वेगवेगळ्या प्रकारे लोकांची मिटींग घ्यायचो. पण त्याच्यातून लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. परंतु आज निव्वळ राजकारण चाललं आहे, असे म्हणत त्यांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.