पवारांवर काँग्रेसकडून हीन दर्जाची टीका

पवारांवर काँग्रेसकडून हीन दर्जाची टीका

अदाणी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली. तर, अदानी प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवारांनी अदाणी प्रकरणात काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पवारांवर हीन दर्जाची टीका करण्यात आली आहे.

अलका लांबा यांचा पवारांवर निशाणा

शरद पवारांनी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय आणि काँग्रेस प्रवक्ता अलका लांबा यांच्याकडून शरद पवारांना लोभी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अलका लांबा यांनी शरद पवार आणि अदाणी यांचा फोटो अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केला आहे. या फोटोमध्ये शरद पवार आणि अदाणी सोबत बसलेले दिसत आहेत. हा फोटो ट्विट करताना लांबा यांनी लिहिले की, घाबरट आणि लोभी माणसेच स्वत:च्या स्वार्थासाठी हुकूमशाही राजवटीचे गोडवे गात आहेत. भांडवलदार चोरांविरोधात आणि चोरांना पाठीशी घालणाऱ्या चौकीदाराच्या विरोधात जनतेची लढाई तर एकटा राहुल लढतोय. अशा हीन शब्दात अलका लांबा यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

पवरांच्या समर्थनात फडणवीस

दरम्यान, अलका लांबाच्या या ट्विटविरोधात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय. फडणवीस यांनी पवारांचे समर्थन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘राजकारण आपल्या जागी. पण, काँग्रेसच्या नेत्याकडून त्यांच्या ३५ वर्ष जुन्या, देशातल्या वरिष्ठ राजकारणी व्यक्तिबाबत वापरलेले शब्द भयावह आहेत. राहुल गांधी या देशाचे राजकारण विकृत पातळीवर नेत आहेत.’

अदाणी प्रकरणी शरद पवारांची भूमिका काय?

हिंडनबर्गच्या अहवालानुसार अदानी समुहावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. हिंडनबर्गच्या अहवालाला इतके महत्त्व का दिलं जातंय?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. हिंडनबर्गच्या अहवालातून अदानी समुहाला टार्गेट केलं जात असल्याचं शरद पवार म्हणाले. अदानी समुहाने चुकीचे केले असल्यास त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्त्व दिले गेले.

तसेच, अदाणी प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. यावर पवार म्हणाले, या प्रकरणाची जेपीसी चौकशीची देखरेख ही सत्ताधारी पक्षांतर्गतच होईल आणि बहुमत हे सत्ताधारी पक्षाकडे आहे. त्यामुळे जेपीसी चौकशीतून सत्य बाहेर पडणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने अदानी प्रकरणात तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यास सांगितले. त्यामुळे जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त असल्याचे शरद पवार म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version