Cold Wave Alert: थंडीचा जोर वाढणार! उत्तरेकडील शीतलहरींचा महाराष्ट्राला फटका, विदर्भ-उत्तर महाराष्ट्रात गारठा तीव्र

उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.
Cold Wave Alert: थंडीचा जोर वाढणार! उत्तरेकडील शीतलहरींचा महाराष्ट्राला फटका, विदर्भ-उत्तर महाराष्ट्रात गारठा तीव्र

Cold Wave Alert: नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू असतानाच हवामानाने मात्र आपली वेगळीच तयारी दाखवली आहे. उत्तर भारतात दाट धुके, कडाक्याची थंडी आणि ऑरेंज अलर्टमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, याचे परिणाम आता हळूहळू महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत थंडीचा जोर अधिक वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सध्या उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. काही भागांत दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने रस्ते, रेल्वे आणि विमानसेवांवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, ३० डिसेंबरपासून हिमालयीन भागात एक नवं वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झालं आहे. यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रवाह आणखी बळावणार असून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये कोल्ड वेवसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:Delhi Fog : धुक्याचा कहर आणि हवेचे प्रदूषण! दिल्लीत 'ऑरेंज अलर्ट' जारी; विमानांची उड्डाणे खोळंबली

महाराष्ट्र थेट शीतलहरीच्या प्रभावाखाली नसला, तरी शेजारच्या राज्यांतील तापमान घसरणीचा परिणाम राज्यावर होणार आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागपूर, गोंदिया, अमरावती, नाशिक आणि आसपासच्या भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज आहे. पुढील दोन दिवसांत तापमान स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी त्यानंतर २ ते ४ अंश सेल्सिअसने पारा खाली येऊ शकतो.

उत्तर महाराष्ट्रातील परभणी, धुळे, अहिल्यानगर, निफाडसारख्या भागांमध्ये रात्री आणि पहाटेच्या वेळेस गारठा अधिक जाणवणार आहे. जरी दिवसा कमाल तापमानात किंचित वाढ दिसून आली, तरी थंडीची तीव्रता कमी होणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २ जानेवारीपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, नव्या वर्षाची सुरुवात देखील गारठा आणि धुक्याने होणार असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा:Milk Adultration Scam : जीवाशी खेळ! तुम्ही डिटर्जंट पावडर मिक्स असलेलं दूध तर पित नाही आहात ना? अंधेरीतील धक्कादायक प्रकार उघड Video Viral

दरम्यान, उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांनाही या बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत आहे. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी नियोजित प्रवास करणाऱ्या पर्यटकांना दाट धुक्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाने नागरिकांना थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यातील बहुतांश भागांमध्ये रात्री उबदार कपडे वापरणे, वृद्ध, लहान मुलं आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. एकूणच, उत्तर भारतातील हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रावर स्पष्टपणे जाणवत असून, पुढील काही दिवस हिवाळ्याचा कस लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version