नागपूरच्या गोधणी परिसरात मध्यरात्री क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्री लोक गाढ झोपेत असतानाच नागपूरमधील गोधणी नगरपंचायतच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात अचानक क्लोरिन वायूची भीषण गळती झाली. यामुळे आसपास राहणाऱ्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 40 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या विषारी वायूच्या प्रभावामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला तसेच मळमळ आणि उलट्या देखील होऊ लागल्या. यानंतर प्रकल्पातील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसह सुमारे 40 जणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान यातील चार ते पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासनासह एनडीआरएफचे पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून जवळपास 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना तातडीने स्थलांतरीत करण्यात आले आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून आज सकाळी 11 वाजेपर्यंत या परिसरात येण्यास सामान्यांना मनाई करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर ही गॅसगळती नेमकी कशी झाली हे अद्याप कळू शकलेलं नसून अग्निशमन विभागाकडून या संदर्भात तपास केला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.