Chhatrapati Sambhajinagar:शेतात काम करताना काळाचा घाला; छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडण्याच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत. सिल्लोडच्या दहीगावात पती-पत्नी तर पिशोरमध्ये तिघांचा मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar:शेतात काम करताना काळाचा घाला; छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून पाच जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी वीज पडल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये सिल्लोड तालुक्यातील दहीगाव येथे पती-पत्नीचा, तर कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील वाघुळखेडा येथे तीन जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्घटनांमध्ये चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सिल्लोड तालुक्यातील दहीगाव येथे शेतातील झोपडीवर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मनोहर भिवसन दुधे आणि पर्वताबाई मनोहर दुधे अशी मृतांची नावे आहेत. दुधे कुटुंबीय मूगाच्या शेंगा तोडण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान, परिसरात पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी कुटुंबातील काही जण शेतातील झोपडीत थांबले होते. याचवेळी झोपडीवर अचानक वीज कोसळली.

या दुर्घटनेत मनोहर दुधे आणि पर्वताबाई दुधे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा या घटनेत जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, वीज पडण्याची दुसरी घटना कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरातील वाघुळखेडा येथे घडली. येथे काही जण अद्रकाच्या शेतात निंदणीचे काम करत होते. काम सुरू असतानाच अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही जण जवळच्या कवठाच्या झाडाखाली थांबले.

याचवेळी झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत फर्जाना हामीद सय्यद, आल्मीरा हामीद सय्यद आणि तस्लीम मुक्तार सय्यद यांचा मृत्यू झाला. या घटनेत अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

एकाच जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः शेतीची कामे सुरू असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट होत असल्याने शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पावसाळ्यात वीजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा उघड्या शेतात थांबणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे शक्य असल्यास सुरक्षित आणि पक्क्या ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी केले जाते. या दोन दुर्घटनांमुळे दहीगाव आणि वाघुळखेडा परिसरावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version