Chhatrapati Sambhajinagar: व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन, किचनमध्ये झुरळांचा वावर; छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ने कारवाई करत पिझ्झा हट आणि शेळके मामा ढाब्याचा अन्न परवाना निलंबित केला. व्हेज-नॉनव्हेज सरमिसळीसह स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या.
Chhatrapati Sambhajinagar: व्हेज-नॉनव्हेजसाठी एकच ओव्हन, किचनमध्ये झुरळांचा वावर; छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. वाळूज एमआयडीसी परिसरातील पिझ्झा हट आणि खुलताबाद येथील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीदरम्यान वाळूज एमआयडीसीतील पिझ्झा हटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी एकाच ओव्हनचा वापर केला जात असल्याचे आढळले. त्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांच्या स्वतंत्र हाताळणीसंदर्भातील नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सोयाबीन तेलाचा वापर केला जात असल्याचेही तपासणीत आढळले.

दुसरीकडे, खुलताबाद येथील शेळके मामा ढाबा रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरातही अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे योग्य विलगीकरण केले जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. याशिवाय स्वयंपाकघरात पाणी साचलेले होते. खिडक्यांना जाळ्या नसल्याने कीटकांचा प्रवेश होण्याची शक्यता होती. तपासणीदरम्यान झुरळांचा वावरही आढळून आला.

यासोबतच कर्मचाऱ्यांकडून अॅप्रन आणि हातमोज्यांचा योग्य वापर केला जात नसल्याचे आढळले. स्वयंपाकघरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहेत. निलंबनाच्या काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version