मुंबईकरांच्या सकाळच्या प्रवासाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. नाहूर आणि भांडुपदरम्यान सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळेत हा प्रकार घडल्याने कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर अनेक लोकल गाड्या सुरक्षिततेच्या कारणास्तव रुळांवरच थांबवण्यात आल्या. त्यामुळे एका मागोमाग एक लोकल खोळंबल्या असून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सध्या लोकल सेवा साधारण २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.
या बिघाडाचा परिणाम ठाणे, मुलुंड, भांडुप, घाटकोपर आणि कुर्ला यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरही दिसून आला. गाड्या वेळेत उपलब्ध होत नसल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. काही लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्याने डब्यांमध्ये मोठी गर्दी झाली आहे.
दरम्यान, काही लोकल बराच वेळ दोन स्थानकांदरम्यान थांबून राहिल्याने प्रवाशांमध्ये नाराजी दिसून आली. बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून सेवा पूर्ववत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सकाळच्या गर्दीच्या वेळेत झालेल्या या तांत्रिक समस्येमुळे मुंबईकरांचा आजचा प्रवास मात्र चांगलाच रखडला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.