मुंबई: मध्य रेल्वेची लोकल सेवा आज सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून, कामाच्या गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे हजारो चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान डाऊन स्लो ट्रॅकला अचानक तडा गेल्याचे सकाळी 7:32 वाजता समोर आले. तुटलेला ट्रॅक लक्षात येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ या मार्गावरील वाहतूक बंद केली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक आणि सुरक्षा पथकाने घटनास्थळी दाखल झाले. वेगाने दुरुस्तीचे काम सुरू करून साधारण 1 तासात ट्रॅकची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. मात्र, खबरदारी म्हणून संबंधित मार्गावर लोकल गाड्या केवळ 30 किमी प्रती तास वेगमर्यादेतच चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकल सेवा 30 ते 45 मिनिटांनी उशिराने धावत आहे.
स्टेशन्सवर प्रचंड गर्दी
वाहतूक कोंडी वाढली ही घटना ऐन कार्यालयीन वेळेत झाल्याने विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग यांसह अनेक स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. प्लॅटफॉर्मवर आणि ट्रॅकवर लोकल एकामागून एक थांबू लागल्या. अनेक प्रवाशांनी नोकरीवर वेळेत पोहोचण्यासाठी ऑटो, टॅक्सी किंवा बेस्ट बसचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे स्थानकांच्या बाहेरील रस्त्यांवर मोठी कोंडी निर्माण झाली.
वेळापत्रकात झाले मोठे बदल
स्लो गाड्या जलद मार्गावर तुटलेल्या ट्रॅकमुळे मध्य रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले. बिघाडाचे काम सुरू असताना माटुंगा स्थानकापासून डाऊन स्लो लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे स्लो मार्गावर उतरणाऱ्या प्रवाशांना मोठी अडचण सहन करावी लागली. जलद मार्गावर स्लो गाड्यांची भर पडल्याने फास्ट लोकल्सच्या वेळापत्रामध्ये सुद्धा बदल झाला. यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या तसेच ठाणे व कल्याणच्या दिशेने धावणाऱ्या लोकल्स अर्ध्या तास उशिराने धावत होत्या. मध्य रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, सेवा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.