मुंबई: आधुनिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळत असल्याने अनेकजण विविध शहरांकडे स्थलांतर करतात. यामुळे, मुंबई आणि मुंबई उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. इतकंच नाही, तर उत्तर पश्चिम मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दररोज हजारो वाहनांची गर्दी होते, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषत: दहिसर ते भाईंदर या मार्गावर प्रवास करणे हे नागरिकांसाठी त्रासदायक ठरतं. वाहतुक कोंडीमुळे, दहा किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी जवळपास 50 मिनिटांचा वेळ लागतो. या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर ते भाईंदरदरम्यान नवा लिंक उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून दहा किलोमीटरचं अंतर तीन मिनिटांत पार करता येईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लिंक रोडसाठी आवश्यक असलेली 55 हजार 174 एकरमध्ये विस्तारलेलं मिठागर जमीन केंद्र सरकारने मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली आहे. ही जमीन 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर 12.9 कोटी रुपयांत देण्यात आली आहे. या जमिनीवरूनच लिंक रोडचे बांधकाम होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पश्चिम उपनगरांतील दहिसर ते भाईंदर प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास आरामदायी होईल, अशी अपेक्षा आहे.
हा लिंक रोड अंदाजे 5 किलोमीटर लांबीता आणि 60 मीटर रुंदीचा असणार आहे. सध्या दहिसरहून भाईंदरला जाण्यासाठी प्रवाशांना साधारणत: 10 किलोमीटरचा मार्ग गाठावा लागतो. मात्र, नव्या लिंक रोडमुळे हे अंतर कमी होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे. प्रवाशांना वाहतुकीच्या कोंडीतून सुटका मिळून आरामदायी प्रवास शक्य होईल. मिळालेल्या माहितीनुसार, हा रस्ता कांदिवलीतील मेट्रो स्थानकाजवळून सुरू होईल आणि उत्तन रोडपर्यंत जाईल. याशिवाय, हा लिंक रोड भाईंदर पश्चिमेकडील सुभाषचंद्र बोस मैदानाशी जोडला जाईल. त्यामुळे, पश्चिम उपनगरांमधील अनेक भागांना थेट जोडणी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे दहिसर, मीरा रोड आणि भाईंदर परिसरातील नागरिकांचा प्रवास सुलभ होईल. दररोज कामासाठी मुंबईत येणाऱ्या हजारो प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यासह, वाहतूक कोंडीतून होणारा इंधानाचा अपव्यय आणि प्रदूषणही कमी होणार आहे. नव्या लिंक रोडच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर पुढील काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.