Accident News : रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला! भावाला राखी बांधण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, चिमुकलीचे शीर धडावेगळे; मद्यधुंद चालकाने उद्ध्वस्थ केले कुटुंब

Accident News : रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाचा घाला! भावाला राखी बांधण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, चिमुकलीचे शीर धडावेगळे; मद्यधुंद चालकाने उद्ध्वस्थ केले कुटुंब

प्रफुल खंडारे, प्रतिनिधी 

बुलढाणा : सगळीकडे भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेल्या 'रक्षाबंधन'चा उत्साह, हातामध्ये राखी आणि मनात भावाच्या उदंड आयुष्याची प्रार्थना…परंतु एका निष्काळजी आणि मद्यधुंद चालकाच्या अतीवेगाने या सर्व आनंदाचा क्षणात चुराडा केला. भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणीवर आणि तिच्या निष्पाप बालकांवर काळाने असा काही भीषण झडप घातली की, उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर गावाजवळ 'ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या एका थरारक अपघातात आईसह तिच्या निष्पाप चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर भाऊ आणि दुसरा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

​राखी बांधण्यापूर्वीच भावाची साथ सुटली 

​मिळालेल्या माहितीनुसार, सपना संजय वास्कले (वय 22, रा. जोसंदी, ता. जि. बुरहानपूर) या रक्षाबंधनानिमित्त आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात होत्या. सोबत त्यांची मुले व भाऊ असा प्रवास सुरू होता. भावाच्या हातावर राखी बांधून सण साजरा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. मात्र संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर गावाजवळ एका भरधाव बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हेही वाचा : CJP And Sonam Wangchuk : सोनम वांगचुक पुन्हा दिसणार CJP च्या आंदोलनात? वांगचुक यांच्या वक्तव्याने खळबळ

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, आठ महिन्याच्या चिमुकलीचे शीर धडावेगळे

​या अपघाताचे दृश्य अत्यंत भयानक आणि विदारक होते. मद्यधुंद चालकाच्या धडकेमुळे एका 8 महिन्याच्या चिमुकलीचे शीर धडावेगळे झाले. सपना वास्कले आणि त्यांची अवघ्या 8 महिन्यांची चिमुकली मुलगी कु. पूर्वी संजय वास्कले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ​या अपघातात महिलेचा भाऊ कमलेश भुरलाल चौगंड (वय 26, रा. बोरव्हा, ता. तेल्हारा, जि. अकोला) आणि सनवीर संजय वास्कले (वय 4 वर्ष) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. तर सपना वास्कले व चिमुकल्या पूर्वीचे शवविच्छेदन शेगाव येथे सुरू आहे.

​नागरिकांचा आक्रोश, बोलेरो पेटवली; रुग्णवाहिकेची तोडफोड

​अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील भयानक दृश्य आणि निष्पाप जीवांचा तडफडून झालेला अंत पाहून ग्रामस्थांच्या रागाचा अनावर उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त बोलेरो वाहन घटनास्थळीच पेटवून दिले. एवढेच नव्हे, तर मद्यधुंद चालकाला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी नागरिकांनी चालकाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची (ॲम्बुलन्स) देखील तोडफोड केली. ​घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला शांत केले आणि चालकाला सुरक्षीतपणे रुग्णालयात हलवले. प्राथमिक माहितीनुसार, अपघात घडवणारा बोलेरो चालक रवी घोगले (रा. कर्वे नगर, पुणे) हा प्रचंड दारूच्या नशेत गाडी चालवत होता. पुढील तपास सोनाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. ​रक्षाबंधनाच्याच दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा व अकोला जिल्ह्यात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, मद्यधुंद चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version