Tapovan Vidyalaya Bhayander: अजब फतवा! डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड, मनसे आक्रमक; शाळेला ‘कारणे दाखवा’ नोटीस

Raj Thackeray

MNS Protests Bhayander School for Food Rules: कांदा आणि लसणानंतर आता शाळेत डब्यात चक्क हिरवी मेथी आणण्यास मनाई करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाईंदरच्या इंद्रलोक भागातील ‘तपोवन विद्यालय’ या खासगी शाळेने डब्यात मेथीची भाजी आणलेल्या एका विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड ठोठावून त्याला शाळेतून जेवण दिले. विद्यार्थ्याच्या दैनंदिनीत ‘डब्यात हिरवी मेथी आणण्यास परवानगी नाही’ असा शेरा वर्गशिक्षकांनी लिहून दिल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

मनसेचा आक्रमक पवित्रा अन् महापालिकेच्या शिक्षण विभागाची नोटीस

या अजब कारवाईनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेत पालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली. मनसे पदाधिकारी रॉबर्ट डिसूझा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने या घटनेची गंभीर दखल घेत ‘तपोवन विद्यालय’ प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांवर आहाराबाबत असे अवाजवी निर्बंध घालणे हे ‘शिक्षण हक्क कायद्याचे’ (RTE) स्पष्ट उल्लंघन असल्याचे शिक्षण विभागाने आपल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

हेही वाचा – Devendra Fadanvis : “आम्ही शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार” दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये केली मोठी घोषणा

धार्मिक कारणावरून आहारावर निर्बंध लादल्याचा पालकांचा आरोप

तपोवन विद्यालयात शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे जैन समाजातील असून, विशिष्ट समाजात मेथी वर्ज्य मानली जात असल्याने हा फतवा काढल्याचे समजते. प्रवेशाच्या वेळी पालकांना मांसाहारी पदार्थ व कंदमुळे न देण्यास सांगण्यात आले होते, मात्र आता हिरव्या पालेभाज्यांवरही बंदी आणल्याने पालकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. याआधीही भाजप आमदार नरेंद्र मेहता चालवत असलेल्या मीरा रोड येथील एका शाळेत पर्युषण काळात कांदा, लसूण आणि बटाटे आणण्यावर बंदी घातल्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

शाळा प्रशासनाकडून मौन; मनसेकडून कारवाईची मागणी

अशा प्रकारे डब्यातील खाद्यान्नावर वारंवार बंदी घालण्याचे प्रकार थांबत नसल्याने मनसेने शिक्षण विभागाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संपूर्ण वादावर आणि 50 रुपयांच्या दंडाबाबत शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. आता शिक्षण विभागाच्या कारणे दाखवा नोटीसला शाळा प्रशासन काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Crime News: माथेफिरू व्यक्तीचा भयानक क्रूरपणा; पत्नी, मुलगा अन् 2 पुजाऱ्यांना संपवलं, पोलिसांच्या चकमकीत आरोपीचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version