मुंबई : बेस्ट उपक्रमातील कर्मचारी, खासगी कंपन्यांमार्फत चालवल्या जाणाऱ्या बेस्ट बसगाड्यांवरील वेट लीज कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर युनियन आक्रमक झाली आहे. युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी मंगळवार, 18 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या कालावधीतील प्रलंबित वेतन करार तातडीने करण्याची, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि महापालिका समकक्ष वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच वेट लीज कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम देण्याची मागणी युनियनने केली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि अंतिम देणी वेळेत देण्यात यावीत. तसेच बेस्ट उपक्रमाला आवश्यक आर्थिक निधी तातडीने मंजूर करून द्यावा, अशीही मागणी आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता 42 कॅनेडी ब्रिज, ऑपेरा हाऊस येथील बेस्ट वर्कर युनियन कार्यालयात हे आंदोलन सुरू होणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याची भूमिका शशांक राव यांनी घेतली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.