बांगलादेशमध्ये मंदिरातील केअरटेकर साधू नयन दास यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. बांग्लादेश मधील कॉक्स बाजार जिल्ह्यातील खुरुश्कुल युनियन परिसरात ही घटना घडली. 35 वर्षीय नयन दास हे पुलिश्शोरा घोना नाग पंचमी मंदिरात काम करत होते आणि तीन दिवसांपासून बेपत्ता होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे 9 वाजता काही अज्ञात व्यक्तींनी नयन दास यांना त्यांच्या घरातून बोलावून नेले. त्यानंतर ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही माहिती मिळाली नाही. 20 एप्रिल 2026 रोजी कॉक्स बाजार सदर मॉडेल पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
बुधवारी दुपारी स्थानिक नागरिक मंदिराजवळील डोंगराळ भागात शोध घेत असताना एका झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. हा मृतदेह नयन दास यांचाच असल्याचे नंतर स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून पुढील तपास सुरू केला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृतदेहाच्या गळ्याभोवती कापड गुंडाळलेले आढळले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस अधिकारी मोहम्मद सामीउद्दीन यांनी सांगितले की, हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या, हे पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच स्पष्ट होईल. मात्र मंदिराशी संबंधित काही व्यक्तींनी हत्या करून नंतर मृतदेह झाडाला लटकवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर बांगलादेशातील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक संघटनांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत हिंदू समुदायावर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.