धाराशिव : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा १८ वा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी मंगळवारी आंदोलनासाठी मुंबईला निघण्याची घोषणा केली. ते 19 सप्टेंबरला मुंबईत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मराठा बांधव आक्रमक होताना दिसत आहेत. एका जरांगे पाटील समर्थक तरुणाने ओमराजे निंबाळकर यांना फोन करुन जाब विचारल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये मराठा तरुण ओमराजे निंबाळकर यांना, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही का सपोर्ट करत नाही ? असा सवाल विचारत आहे. मनोजदादांच उपोषण सुरू असतानाही तुम्ही का गेला नाही?, असे या तरुणाने ओमराजे यांना विचारले.
यावर ओमराजे निंबाळकर यांनी या तरुणाला प्रतिप्रश्न केला. मी अकरावेळा मनोज जरांगेंकडे जाऊन आलो, ते तुम्हाला दिसलं नाही का?, असे ओमराजेंनी म्हटले. त्यावर तरुण म्हणाला की, या टप्प्यात आंदोलन सुरु असताना तुम्ही गेला नाहीत. तेव्हा ओमराजे निंबाळकर म्हणाले की, आमदार कैलास पाटील जाऊन आले ना, आम्हीपण त्यांना भेटायला जाणार आहोत. त्यावर तरुणाने ओमराजेंना पुन्हा विचारले की, ‘कैलास पाटील उद्धव ठाकरे गटाचे आहेत, तुम्ही शिंदे गटाचे आहात. तुमचा आणि त्यांचा संबंध काय? दादा हे चुकीचं आहे. आम्ही मराठा समाज म्हणून तुम्हाला मतदान करतो,’ असे या तरुणाने म्हटले. ही कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र पुष्टी करत नाही. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.