श्रावण महिना सुरू होताच हवामानात मोठे बदल झाले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत पावसाने कमबॅक केलं आहे. तसेच राज्यात काही भागांत ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस सुरु आहे. दरम्यान आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भासह 18 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. यावेळी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि नाशिकसह घाटभागात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत ढगाळ व दमट हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी पावसाच्या वेळी खबरदारी घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.