मुंबई : अवघ्या दोन दिवसांवर गणेश जयंती आली आहे. येत्या सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. कोकणात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. कोकणात घरोघरी गणपती बसवले जातात. यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधून भाविक कोकणात जातात. त्यामुळे रेल्वे, एस बसेस, खासगी बसेस, खासगी चारचाकी गाड्या अशा विविध वाहतूक मार्गांचा पर्याय ते निवडतात. प्रामुख्याने रेल्वे आणि बसेसमधून मोठ्या संख्येने प्रवास केला जातो. त्यामुळे रेल्वे आणि एसटी बसचे बुकिंग न मिळालेल्या प्रवाशांना खासगी बसेसचा पर्याय निवडावा लागतो. मात्र अशातच गणेशोत्सवाच्या काळात खासगी प्रवासी बसचालकांकडून मनमानी भाडेवाढ होत असल्याचे दरवर्षी पाहायला मिळते. यंदाही एसटीच्या तुलनेत खासगी बसचे दर तिप्पटपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. मुंबईहून कोकण आणि राज्यातील अन्य भागांत जाणाऱ्या गणेशभक्तांना आर्थिक फटका बसताना दिसत आहे. मुंबईहून रत्नागिरी, सावंतवाडी, गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी खासगी बसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
हे खासगी बसचे दर –
रत्नागिरीसाठी खासगी बसचे भाडे 4,200 रुपये, एसटीचे 690 रुपये
चिपळूणसाठी खासगी बसचे भाडे 4,800 रुपये, एसटीचे 520 रुपये
दापोलीसाठी खासगी बसचे भाडे 2,000 रुपये, एसटीचे 455 रुपये
कणकवलीसाठी खासगी बसचे भाडे 3,900 रुपये, एसटीचे 685 रुपये
खेडसाठी खासगी बसचे भाडे 2,990 रुपये, एसटीचे 455 रुपये
सावंतवाडीसाठी खासगी बसचे भाडे 4,800 रुपये, एसटीचे 1,025 रुपये
यंदा 9,500 गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी 700 गाड्या वाढविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या. एसटीच्या तिकिटदराच्या दीडपट तिकीट आकारण्याची मुभा खासगी वाहतुकदारांना कुणी दिली, असा सवाल उपस्थित होत आहे. जादा भाडे आकारल्यास संबंधित वाहतुकदारांवर कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाकडून देण्यात आला आहे. एसटी तिकीटदराच्या दीडपटपेक्षा अधिक भाडे आकारल्यास परिवहन विभागाकडून कारवाई होणार आहे. एसटीने प्रवास केल्यास अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के आणि महिलांना 50 टक्के तिकीट सवलत मिळणार आहे. एसटीच्या तुलनेत खासगी बसने सुरक्षित प्रवास करता येतो, असा दावा वाहतुकदारांकडून करण्यात आला. मात्र, खासगी बसचे वाढलेले दर आणि प्रवाशांची आर्थिक लूट यावरून वाद निर्माण झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.