पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणावर आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यांनी या व्यवहारातील अनियमितता उघड करत “हा जमीन व्यवहार पार्थ पवार किंवा शीतल तेजवानी रद्दच करू शकत नाहीत,” असा गंभीर आरोप केला आहे. दमानिया यांनी सांगितले की, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतल्याची चर्चा आहे. या जमिनीचा मूळ हक्क गायकवाड कुटुंबाला मिळालेला होता, परंतु ती जमीन नंतर खालसा झाली होती. “जर ती जमीन गायकवाडांच्या नावावर परत आलीच नाही, तर त्यांच्यावतीने कोणीही तो व्यवहार करणे योग्य नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दमानिया यांनी पुढे शितल तेजवानी यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “शितल तेजवानी नावाची व्यक्ती फक्त 11,000 रुपये भरून 30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवते, पण त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. कलेक्टरनी अशा प्रकरणात दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी दावा केला की तेजवानी यांनी ज्याचा उल्लेख ‘पॉवर ऑफ अटर्नी’ म्हणून केला आहे, ती नोंदणीकृत (रजिस्टर) नसलेली आहे, त्यामुळे त्या कायदेशीररीत्या कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार करू शकत नाहीत.
‘कॅन्सल ऑफ डॉक्युमेंटेशन’ प्रक्रिया स्पष्ट करताना दमानिया म्हणाल्या, “कोणत्याही व्यवहाराचा रद्दबातल करण्यासाठी विक्रेता आणि खरेदीदार दोघेही हक्कसंपन्न असणे आवश्यक असते. पण शितल तेजवानी ही जमिनीची मालक नसल्याने, तिच्या सहीने व्यवहार रद्द करणे शक्य नाही. अशा प्रकारचा व्यवहार रद्द करण्यासाठी सरकारला सिव्हिल कोर्टात दावा दाखल करावा लागतो.” त्या म्हणाल्या, “माध्यमांमधून 42 कोटी रुपये भरल्यानंतर हा व्यवहार रद्द होईल, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत; पण प्रत्यक्षात ते अशक्य आहे.”
दमानिया यांनी या प्रकरणाशी संबंधित विविध कायदेशीर कागदपत्रे वाचून दाखवत, संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचा आरोप केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.