Triple Talaq Case: ठाणे जिल्ह्यात तिहेरी तलाकाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हुंड्यात बुलेट मोटारसायकलची मागणी पूर्ण न झाल्याने एका तरुणीला लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांत पतीने बेकायदेशीर तिहेरी तलाक देत घराबाहेर काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित महिलेने भिवंडी तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
लग्नानंतर सासरी अत्याचाराची सुरुवात
दरम्यान, 25 वर्षीय पीडितेचे लग्न 19 ऑक्टोबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील मोहम्मद रशीद याच्याशी झाले. लग्नानंतर ती पतीच्या नान्हुई (जि. सुलतानपूर) येथील घरी राहायला गेली. तिथे गेल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून तिच्यावर अत्याचार व मानसिक छळ करण्यात येऊ लागला, असे तिने पोलिसांना सांगितले.
हुंड्यात बुलेट मोटारसायकलची आग्रही मागणी
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत सांगितले की तिच्या कुटुंबाने सोन्याची अंगठी, घड्याळ, कपाट, बेड, सोफा, रेफ्रिजरेटर, एसी, वॉशिंग मशीन, मिक्सर यांसारख्या सर्व आवश्यक वस्तू दिल्या होत्या. तरीही सासरच्या लोकांना या भेटवस्तूंचे समाधान नसून ते हुंडा म्हणून बुलेट मोटारसायकलची मागणी करत होते. ही मागणी न पटल्यानं तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार वाढले.
हेही वाचा – Crime News: 'आमच्याकडे महागड्या गाड्या आहेत; तू आमची…'; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
पतीकडून बेकायदेशीर 'तिहेरी तलाक'
तक्रारीत नमूद केल्यानुसार, 21 ऑक्टोबर रोजी पतीने तिहेरी तलाक देऊन तिला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिला मारहाणही केली. तिहेरी तलाक 2019 च्या कायद्यानुसार गुन्हा असूनही, पतीने उघडपणे कायद्याचे उल्लंघन केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा नोंद
तक्रारीनंतर पोलिसांनी पती मोहम्मद रशीद, त्याचे पालक, आणि दोन बहिणी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 85 (क्रूरता), 115 (दुखापत करणे) तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायदा आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकरणाची चौकशी सुरू असून अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. ही घटना तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित झाल्यानंतरही अशा घटना कशा घडू शकतात, हा गंभीर प्रश्न निर्माण करते. पीडित महिला आता कायदेशीर न्यायाची अपेक्षा करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.