छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर शहरात एका खासगी शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील शिपायाने इयत्ता सहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीला चॉकलेटचे आमिष दाखवून शाळा सुटल्यानंतर एकांतात नेऊन तिचा वारंवार विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी विजय मगन पारखे (वय 46, रा. वाहेगाव) याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थिनीला चॉकलेटचे आमिष दाखवून शाळेच्या परिसरातील एकांत ठिकाणी बोलावले आणि तिच्या शरीराला अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार हा प्रकार पाच ते सहा वेळा घडल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती विद्यार्थिनीने एका शिक्षिकेला दिल्यानंतर शिक्षिकेने तातडीने मुख्याध्यापिकांना याबाबत कळवले. विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन संपूर्ण प्रकाराची खात्री केल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक पाटील करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.